Saturday, March 9, 2013

बामसेफच्या ऐक्याची बैठक वादळी ठरणार

Published: Saturday, March 2, 2013

एकेकाळी बहुजन समाज पक्षाला आर्थिक रसद आणि बुद्धिजीवी मनुष्यबळ पुरविणाऱ्या बामसेफ या सरकारी व निमसरकारी क्षेत्रातील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनेत अनेक गट-तट पडल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच आता प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावत संघटनेच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी विविध गटांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. प्रस्थापित नेतृत्वालाच आव्हान दिले जाणार असल्याने ही बैठक काहीशी वादळी ठरण्याची शक्यता आहे. 
बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या पुढाकारातूनच बामसेफ या संघटनेची स्थापना करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संघटित करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. देशभर ही संघटना फोफावली. केडर बेस्ड या संघटनेचे देशभरात एक लाखाच्या वर सदस्य आहेत. त्यात आएएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. या संघटेच्या जिवावरच कांशीराम यांनी बसपची स्थापना केली. याच बसपने पुढे उत्तरेतील काही राज्यांमध्ये दमदार राजकीय वर्चस्व प्रस्थापित तर केलेच शिवाय उत्तर प्रदेशची सत्ताही हातात घेतली. बसपच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मात्र या संघटनेकडे फारसे लक्ष्य दिले नाही. परिणामी संघटनेतही नेतृत्वाच्या वादातून अनेक गट-तट जन्माला आले. सध्या बामसेफ आठ ते दहा गटात विभागली आहे. त्यामुळे गेली वीस-पंचवीश वर्षांपासून संघटनेत निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांनी आता प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देत संघटनेची पुनर्माडणी करण्याचे ठरविले आहे. 
दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये उद्या सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातून जवळपास ३५० ते ४०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मूळ घटनेवर आधारीत संघटनेची फेररचना करण्याबाबत कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली जाणार आहेत. रविवारी दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत नव्या स्वरुपातील संघटनेच्या स्थापनेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे, अशी माहिती बामसेफ समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.

http://www.loksatta.com/mumbai-news/stromy-bamcef-meeting-for-alliance-held-on-saturday-and-sunday-72548/


No comments:

Post a Comment