Monday, March 2, 2015

भगवान बुध्दांचे चार आर्यसत्य भगवान बुध्दाचे उपदेश चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत.

भगवान बुध्दांचे चार आर्यसत्य

भगवान बुध्दाचे उपदेश चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत.
आजच्या काळात 'आर्य' या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात 'आर्य' या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो, तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्या्पैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला 'आर्य' असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. 
आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो. अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो. 
१. पहिले आर्यसत्य - दु:ख 
दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे, हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किंवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे. आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.
२. दुसरे आर्यसत्य - दु:ख समुदय 
दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख का होते? त्याला दु:ख का भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अशा विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.
परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले, ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावला. पुनःपुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्ती असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा, हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किंवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही. 
तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिणक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्यास सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.
भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किंवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी हो‍ऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा! 
विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.
३. तिसरे आर्यसत्य - दु:खनिरोध
दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती , तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्तर झाले, तो तृष्णेपासून मुक्ती होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्तन होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किंवा भ्रांती होते. अशा तर्हे ने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो. 
४. चवथे आर्यसत्य - दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा 
दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो. 
जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, "दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा." तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, "माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल." 
हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन." बारावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन." तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन." चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी चोरी करणार नाही." पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी व्यभिचार करणार नाही." सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी खोटे बोलणार नाही." सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, "मी दारु पिणार नाही." जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्या् अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो. 
अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात. 
दहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व इतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, "आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे." 
आर.के.जुमळे


No comments:

Post a Comment